विद्यार्थ्यांनो केवळ नोकरी शोधणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे, नवनिर्मिती करणारे आणि समस्या सोडवणारे बना – राज्यपाल जिष्णुदेव वर्मा
रायगड : भारताचा विकसित राष्ट्राचा प्रवास महानगरांपुरता मर्यादित राहणार नसून तो गावांमध्ये, लहान शहरांमध्ये आणि विद्यापीठांमध्येही घडणार आहे. त्यामुळे पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या संधी शोधणारे न बनता रोजगार निर्माण करणारे, नवनिर्मिती करणारे आणि समाजाच्या समस्या सोडविणारे अभियंते बनावे. शेती, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण उपजीविकेतील प्रत्यक्ष समस्या सोडविण्यासाठी अभियांत्रिकी ज्ञान, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केले.
लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या २८ व्या दीक्षांत समारंभात राज्यपाल वर्मा बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, रोजगार हमी योजना मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कामत, कुलसचिव प्रा.अमित शेष, परीक्षा नियंत्रक डॉ.गीतांजली महामुणकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून राज्यपाल जिष्णुदेव वर्मा म्हणाले, तीव्र स्पर्धा, मोठ्या संधी आणि आव्हानांनी भरलेल्या जगात विद्यार्थी आता प्रवेश करीत आहेत. राष्ट्राची प्रगती नवनिर्मिती आणि संशोधनावर अवलंबून आहे. एखादी नवीन कल्पना शोध असू शकते; मात्र त्या कल्पनेचा उत्पादक आणि समाजोपयोगी वापर करणे म्हणजे नवनिर्मिती होय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील चांगल्या कल्पना केवळ विचार म्हणून न ठेवता त्यांचे कृतीत रूपांतर करावे, असेही ते म्हणाले.
आजच्या भारताने डिजिटल इंडिया, स्किल इंडिया, स्टार्ट-अप इंडिया, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून युवकांना आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सक्षम परिसंस्था निर्माण केली आहे. या संधींचा विद्यार्थ्यांनी उपयोग करावा. आत्मविश्वासाने आव्हानांचा सामना करावा आणि प्रश्न विचारण्यास कधीही घाबरू नये, असे आवाहनही राज्यपाल वर्मा यांनी यावेळी केले.
लोणेरे हे रायगड आणि महाड या ऐतिहासिक स्थळांच्या दरम्यान वसलेले असून, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला, तर महाड येथील चवदार तळ्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेच्या लढ्याला प्रारंभ केला. अशा ऐतिहासिक भूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला लाभले आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, विद्यापीठाने उद्योग आणि समाजाच्या बदलत्या गरजांशी ताळमेळ राखत भविष्यातील गरजांचा वेध घेऊन विविध उपक्रम सुरू केले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर स्किल्स कौन्सिल ऑफ इंडियाच्या सहकार्याने बी.एस्सी. (ऑनर्स) इन इलेक्ट्रॉनिक्सचे अप्रेंटिसशिपयुक्त पदवी अभ्यासक्रम सुरू केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मराठी माध्यमातून तांत्रिक शिक्षण देण्याच्या विद्यापीठाच्या प्रयत्नांचे कौतुक करत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्यासाठी शिक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे. मातृभाषेतील शिक्षण, आंतरविद्याशाखीय अध्ययन, संशोधन आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या या धोरणाची अंमलबजावणी करण्यामध्ये विद्यापीठ अग्रणी असल्याचे त्यांनी सांगितले.
पदवी ही केवळ विद्यार्थ्यांनी काय शिकले याचे प्रमाणपत्र नसून भविष्यात समाजाला काय योगदान देणार आहेत, याची जबाबदारी आहे. ग्रामीण महाराष्ट्रातून आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील प्रत्यक्ष समस्या ओळखून त्यावर तंत्रज्ञानाधारित उपाय शोधावेत. जागतिक पातळीवर विचार करताना आपल्या समाजाच्या गरजा कधीही विसरू नयेत. विकसित भारत २०४७ साकारण्यात अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या गावाशी, शहराशी आणि ज्या समाजाच्या आकांक्षा घेऊन ते पुढे आले आहेत, त्या समाजाशी नाते कायम ठेवावे, असे आवाहनही वर्मा यांनी केले.
विद्यापीठ परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला असून लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही उभारला जाणार आहे. हे दोन्ही पुतळे धैर्य आणि न्यायाची प्रेरणा देत विद्यार्थ्यांना समाजासाठी मोठे योगदान देण्याची आठवण करून देतील, असे त्यांनी नमूद केले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, काही कारणांमुळे गेल्या दोन-तीन वर्षांत विद्यापीठातील परीक्षांचे निकाल जाहीर होण्यास विलंब झाला. मात्र, रात्रंदिवस काम करून निकालांचा बॅकलॉग मोठ्या प्रमाणात दूर केला असून, उर्वरित कामही लवकरच पूर्ण करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी यापुढे निकाल जाहीर झाल्यानंतर तात्काळ पदवी प्रमाणपत्र तयार होऊन ते ‘डिजी लॉकर’मध्ये उपलब्ध होईल. विद्यापीठातील प्राध्यापकांसह रिक्त पदे पुढील तीन महिन्यांत भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. तसेच प्रलंबित निधी, कंपाऊंडसह आवश्यक पायाभूत सुविधा आणि अन्य प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी शासनस्तरावर कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
विद्यापीठातील इनक्युबेशन सेंटरला चालना देऊन विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप्सना सीड कॅपिटल उपलब्ध करून देण्यात येईल. एकल मातांच्या मुला-मुलींना शिक्षणासाठी विशेष पॅकेज देण्याचा प्रयत्न सुरू असून, व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मुलींचा सहभाग वाढविण्यावरही भर दिला जाईल. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी विद्यापीठाची निवड झाली असून, ३५ देशांचे प्रतिनिधी परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी विद्यापीठासाठी जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्त कुटुंबांच्या प्रलंबित नोकरीच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच विद्यापीठाच्या परिसराला संरक्षक भिंत उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दीक्षांत समारंभ हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि सुवर्णक्षण असल्याचे सांगत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या विकासासाठी उपलब्ध ८०० एकरांहून अधिक जागेचा आणि सुविधांचा अधिकाधिक उपयोग करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना यापुढे निकाल व पदवी मिळण्यासाठी विलंब होऊ नये, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन बैठका घेतल्याबद्दल त्यांनी त्यांचे विशेष आभार मानले. तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागातील शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त प्रशिक्षण केंद्र या परिसरात उभारण्याचा प्रस्ताव असून, त्यादृष्टीने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दीक्षांत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.