विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि उच्च शिक्षण संस्थांची प्रशासकीय कार्यक्षमता वाढविण्यासाठी शासन कटिबद्ध – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
जळगाव, २५ नोव्हेंबर : जळगाव येथे उच्च शिक्षण विभागाच्या विभागीय सहसंचालक कार्यालयाच्या नूतन अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंदक्रांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सहसंचालक कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात आला आहे. यामुळे महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, सुलभ आणि पारदर्शक होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन यावेळी पाटील यांनी केले.
यावेळी मंत्री पाटील म्हणाले, विभागाच्या नवीन डिजिटल प्रणालीमुळे शासनाशी संबंधित ९८ ते ९९ टक्के कामकाज ऑनलाइन पद्धतीने होत आहे. राज्यातील सुमारे सहा हजार महाविद्यालयांचे कामकाज अधिक कार्यक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
यासोबतच महाविद्यालयांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत भोजन व्यवस्था, शुद्ध पिण्याचे पाणी आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य, समुपदेशन आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी व्यवस्थापन यांनाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि उच्च शिक्षण संस्थांची प्रशासकीय कार्यक्षमता वाढविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे देखील पाटील यांनी सांगितले.
यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, सहसंचालक डॉ. पराग मसराम, कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील, उपविभागीय अभियंता एस. एल. देवरे यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.