शिवाजीनगरमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली, शिरोळे राष्ट्रवादीत

पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष व काँग्रेसचे जेष्ठ नेते श्रीकांत शिरोळे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. निश्चितच शिरोळे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीची शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील ताकद वाढणार आहे.

शिवाजीनगर भागात स्वतःच एक वेगळं स्थान असणार व्यक्तिमत्व म्हणजे श्रीकांत शिरोळे आदराने भांबुर्डा – गावठाण सोबतच शहरातील अनेक मान्यवर त्यांना ‘भाऊ’ म्हणतात. जनता पक्षातून राजकारणात उतरलेले भाऊ नंतर गाडगीळ यांचा हात धरून काँग्रेसवासी झाले. महानगरपालिकेतील अभ्यासू नगरसेवक म्हणून नाव लौकिक मिळालेले शिरोळे यांनी स्थायी समिती अध्यक्ष पदावर असताना केलेली काम आज देखील चर्चेचा विषय आहेत. शिवाजीनगर भागासह संपूर्ण पुणे शहरामध्ये त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. श्रीकांत शिरोळे यांचे पुत्र रणजित शिरोळे राजकारणात सक्रिय असून सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यांनी पुण्यात लोकसभा निवडणूक देखील लढविली होती.
शिवाजीनगर मतदार संघामध्ये महानगरपालिका निवडणुकीमध्ये फटका बसला होता, मा. स्थायी समिती अध्यक्ष जेष्ठ नगरसेवक रमेश उर्फ बाळासाहेब बोडके यांना अत्यंत कमी फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले होते. एकेकाळचा राष्ट्रवादीचा गड असणारा शिवाजीनगर मतदारसंघ पुन्हा बांधायला राष्ट्रवादीने सुरवात केली असून श्रीकांत शिरोळे यांच्या सारखा जेष्ठ नेता राष्ट्रवादीमध्ये येणे येत्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक ठरणार आहे.