माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो मी चूक केलेली नाही, ED चौकशीला सामोरा जातोय; अनिल परब म्हणतात…
मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलीचं शपथ घेऊन मी मागेच सांगितलं होतं की मी काही चुकीचं केलेलं नाही. आताही तेच सांगत आहे. मी काहीच चुकीचं काम केलं नाही. मला दुसरं समन्स आल्याने मी ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.
शिवसेनेचे मंत्री अनिल परब हे 28 सप्टेंबर रोजी अंमलबजावणी संचलनालयासमोर (ED) हजर झाले आहेत. ईडीकडून अनिल परब यांना दुसरं समन्स बजावण्यात आलं होतं. ज्यानंतर अनिल परब यांनी ईडीच्या कार्यालयातून जाऊन चौकशीला सहकार करणार असल्याची भूमिका स्पष्ट केली.
अनिल परब काय म्हणाले
‘मला ईडीचं दुसरं समन्स मिळालं आहे आणि मी ईडीच्या चौकशीला जात आहे. मी मागे देखील आपल्याला सांगितलं आहे की, मी शिवसेनाप्रमुखांची शपथ घेऊन आणि मी माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो आहे की, मी असं कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही. म्हणून मी आज चौकशीला सामोरं जात आहोत.’
‘चौकशीत मला जे प्रश्न विचारण्यात येतील. त्याची मी उत्तरं देईन. अजूनही मला माहित नाही की, मला नेमकं कशासाठी बोलावलं आहे. पण जे प्रश्न विचारले जातील त्याची सविस्तर उत्तरं मी देईन. चौकशीला पूर्णपणे सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे.’ ‘चौकशीसाठी मला अद्यापही कोणतं कारण हे देण्यात आलेलं नाही. पण चौकशीला गेल्यावर याबाबत काय ते कळेल. मला चौकशीला बोलावलंय, मी चौकशीला जातोय.. मला एवढं नक्की माहिती आहे की, माझ्याकडून कोणतीही चूक झालेली नाही.’