कामावर हजर असलेल्यांनाच पगार मिळणार; एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांचा इशारा

5

मुंबई: एसटी कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. पगारवाढ केल्यानंतरही एसटी कर्मचारी विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्यामुळे हे आंदोलन अद्यापही सुरूच आहे. एसटी बस बंद असल्याने मात्र सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे आता हे आंदोलन संपवण्यासाठी राज्य सरकार अनेक प्रयत्न करत आहे मात्र तरी देखील एसटी कर्मचारी मागे हटण्यास तयार नाहीत. अशातच आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी आंदोलन करणारया एसटी कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे.

आंदोलन मागे घेण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी सूचक इशारा कर्मचाऱ्यांना दिला आहे. जे कर्मचारी कामावर हजर आहेत, त्यांनाच मंगळवारी वेतन देण्यात येईल,असे सूचक वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले होते. त्यामुळे आज कामावर हजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. वेतनवाढीच्या निर्णयानंतर तब्बल १९ हजार कर्मचारी कामावर परतले आहेत. त्यामुळे आता परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आणखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

राज्यातील २५० पैकी १०५ आगार सुरू झाले असून, एकूण कर्मचाऱ्यांपैकी १९ हजार कर्मचारी कामावर परतल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सोमवारी राज्यभरात एसटीच्या १७०० पेक्षा अधिक फेऱ्या झाल्या आहेत. ज्यामधून एक लाखांपेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. कारवाईच्या धास्तीने अनेक कर्मचारी आंदोलन सोडून कामावर परतण्याला पसंती देत असल्याचे सध्या दिसत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.