संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावू, परिवहन मंत्री अनिल परब यांचा इशारा!

मुंबई: राज्य सरकारने पगारवाढ आणि वेतनवाढ संदर्भातल्या मागण्या मान्य केल्यानंतरही एसटी कर्मचारी आपल्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. एका महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांविरोधात सरकारकडून निलंबनाची कारवाई सुरुच आहे. अशामध्ये आता या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावू असा इशारा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब  यांनी दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला आहे.

अनिल परब म्हणाले की, मेस्मा कायदा अत्यावश्यक सेवेसाठी लावला जातो आणि एसटी ही अत्यावश्यक सेवेत येते. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावायचा का याबाबत सरकार गंभीरपणे विचार करत आहे. लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन ही कारवाई करु. सरकार कठोर पाऊल उचलण्याच्या मानसिकतेत नाही. पण आम्हाला जनतेचा सुद्धा विचार करावा लागेल. कर्मचारी, अधिकारी आणि कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा केली. मेस्मा लावण्याबाबत सरकार लवकर निर्णय घेईल.’

तसंच, ‘आतापर्यंत जी कारवाई करण्यात आली आहे ती मागे घेता येणार नाही. या संपाला आता नेता नाही. पण जो कुणी कर्मचाऱ्यांना भडकावत आहे त्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे अनिल परब यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, विलीनीकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने  नेमलेली समिती निर्णय घेईल.

या समितीसमोर सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना आपले म्हणणे मांडत आहेत. समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर सादर होईल त्यानंतर ते निर्णय घेतील.’ दरम्यान, संप 60 दिवस सुरु राहिला तर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो या सर्व अफवा पसरवल्या जात आहेत. पण याबाबत कोणताही कायदा नाही, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले.