खडकवासला शिवसेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी महावितरणला निवेदन
पुणे/प्रतिनिधी: महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे सामान्य नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र, अनेकदा याबाबत तक्रार करून देखील अधिकारी दाखल घेत नसल्याने, शिवसेना खडकवासला मतदार संघाचे विभागप्रमुख नीलेश गिरमे यांच्या वतीने सर्वपित्री आमावास्येच्या निमित्ताने प्रतिकात्मक श्राद्ध घालत महावितरणचा निषेध करण्यात आला.
यावेळी विविध मागण्यांचे निवेदन वडगांव महावितरण कार्यालयाचे अतिरिक्त अभियंता कल्याण गिरी यांना देण्यात आले.
सिंहगड रस्त्यावरील महावितरणच्या वडगाव उपविभागीय कार्यालयाअंतर्गत धायरी, नऱ्हे, खडकवासला, किरकटवाडी, नांदेड, वडगाव व हिंगणे खुर्द आदी गावांचा समावेश आहे. या उपविभागात महावितरणचे एक लाख बासष्ट हजार ग्राहक असून मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या लोकसंख्येने नवीन वीज ग्राहकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
सध्या ‘कोरोना’ मुळे सामान्य नागरिकांची आर्थिक बाजू कमकुवत झाली असताना त्यात महावितरणच्या स्वैरकारभारामुळे मीटर रिडींग न घेता सरासरी वीज बिल ग्राहकांना दिले जात आहे, यामुळे अनेक ग्राहकांना वाढीव बिल मिळात आहेत. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत.
तसेच सिंहगड रस्त्यावरील विविध परिसरात महावितरणचे अनेक डीपी उघडे असून त्यामुळे लहान मुलांना याचा मोठा धोका आहे, अनेक ठिकाणी एकाच कनेक्शनवर बरेच कनेक्शन देण्यात आले आहेत यामुळे शॉर्ट सर्किट होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर अनेक डीपी मधून ऑईल गळती होत आहे यामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याची शक्यता आहे, तसेच अनेक ठिकाणी विद्युत तारा लटकलेल्या अवस्थेत आहेत त्या भूमिगत करण्यात याव्यात, अश्या असंख्य गोष्टी असून यावर महावितरण कोणतेच पाऊल उचलत नाही.
यावेळी शिवसेना खडकवासला मतदार संघाचे विभागप्रमुख नीलेश गिरमे म्हणाले, ‘एखाद्या ग्राहकाने वीज बिल थकवले तर लगेच कर्मचारी येऊन त्यांचे वीज कनेक्शन बंद करतात. त्याचबरोबर ज्या ग्राहकांना वीज बिले मोठ्या प्रमाणात आले आहेत त्यांना टप्या टप्यात भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी. यासंदर्भात महावितरणने सर्व समस्यांचे लवकरात लवकर निवारण करावे. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला.’
या मागण्यांचा त्वरीत पाठपुरावा करून त्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन वडगांव महावितरण कार्यालयाचे अतिरिक्त अभियंता कल्याण गिरी यांनी दिले.