आर्यन खानला दिलासा नाहीच; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
मुंबई: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा जामीन अर्ज किल्ला न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे आर्यन खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता आर्यनला जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करावा लागणार आहे. आर्यनची काल न्यायालयाने 14 दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली होती. त्यामुळे आज त्याला आर्थर रोड़ तुरुंगात नेण्यात आले आहे. तेथे एका वेगळ्या बराकतीमध्ये त्याला पाच दिवस क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे.
मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये आर्यन खानसह इतर सात जणांना अटक करण्यात आलं होतं. या प्रकरणाचा तपास सध्या एनसीबीकडून सुरु आहे. एनसीबीने आर्यन खानसह अरबाझ मर्चंट (आर्यनचा मित्र), मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा यांना अटक केलं होतं.
आज आर्यन खान तसेच त्याच्यासोबत अटक करण्यात आलेल्या इतर सात जणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यात आली. जामीन अर्जावर तब्बल अडीच तास युक्तिवाद चालला. मात्र, अखेर कोर्टाने आर्यन खानसह अरबाज मर्चंट तसेच मूनमून धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे आता आर्यन खानला तुरुंगातच मुक्काम ठोकावा लागणार आहे.