मुंबईत ‘महाराष्ट्र बंद’ला गालबोट, बेस्ट’च्या ८ बसेसची तोडफोड
मुंबई: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांना मोटारीखाली चिरडून मारल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. सत्तेत असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी हा बंद पुकारला आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष संयुक्तपणे निषेध नोंदवून आंदोलन करत आहेत. या सगळ्या दरम्यान, महाराष्ट्रात बंदचा परिणाम स्पष्टपणे दिसू लागलेला आहे. तसेच, मुंबईच्या विविध भागात आतापर्यंत आठ बेस्ट बसेसची तोडफोड करण्यात आल्याची माहिती बेस्टकडून देण्यात आली आहे.
मुंबईतील बेस्ट बंदचा परिणाम दिसून येत आहे. बेस्टवर शिवसेना युनियनचे वर्चस्व आहे. त्यामुळे महाराष्ट्र बंदचा त्यावर स्पष्ट परिणाम दिसून येत आहे. पण यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या अडचणी वाढल्या आहेत. आज मुंबईत फारच तुरळक बेस्ट बस या रस्त्यावर धावताना दिसल्या. त्यातही जवळजवळ 8 बसेसचे तोडफोड करण्यात आल्याने बरंच नुकसान झालं आहे.
तसेच, महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस पूर्णपणे सतर्क आहेत. मुंबईत सध्या वाहतूक सुरळीत सुरू आहे. पण काही ठिकाणी रॅली काढण्यात आल्याने थोड्या फार प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होत आहे. मात्र, यावेळी मुंबईतील इतर दुकानं आणि आस्थापनं बंद आहेत.