धक्कादायक: अंगावर कोब्रा सोडत पतीने घेतला पत्नीचा जीव

कोल्लम: नागाचा दंश घडवून हत्या करण्याच्या अत्यंत दुर्मिळ प्रकारात कोल्लम सत्र न्यायालयाने पतीला दोषी ठरवले. न्या. एम. मनोज हे हा निकाल देत असताना दोषी पती एस. कुमार (वय28) हा हजर होता. त्याच्या शिक्षेचे स्वरूप 13 ऑक्‍टोबरला जाहीर करण्यात येणार आहे. या गुन्ह्याचे स्वरूप मूलत: घृणास्पद आणि राक्षसी स्वरूपाचे असल्याने आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकीलांनी केली आहे.

केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील अंचल गावात एक वर्षाच्या मुलाची आई असणारी उथरा सर्पदंशाने मरण पावल्याची घटना सात मे 2020 रोजी घडली होती. उथरा यांचा पती आणि मुलगा झोपले असताना दंश केलेला नाग त्याच बेडरूममध्ये सापडला.

सर्पदंशाने झालेला हा मृत्यू असण्याची शक्‍यता स्थानिक पोलिसांनी तातडीने फेटाळून लावली होती. कारण दोन मार्च 2020 ला उथराला तिच्या सासरी वायपर प्रजातीच्या सापाच दंश झाला होता. त्यात तिला दवाखान्यात दाखल करावे लागले होते. त्यामुळे या मृत्यूच्या सखोल तपासाची मागणी तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केली. त्यामुळे पोलिसांनी सखोल तपास सुरु केला. कोल्लम ग्रामीणचे पोलीश अधिक्षक हरिशंकर यांनी जातीने या तपासात लक्ष घातले. उथरा यांचा खासगी फायनानन्स कंपनीत काम करणारा पती एस. कुमार याने हा कट रचून अंमलात आणल्याचे त्यात निष्पन्न झाले.

आपल्या पत्नीचा खून करण्यासाठी एक वायपर आणि एक नाग कुमारने एका सर्पमित्राकडून विकत घेतला होता. वायपर प्रजातीच्या सापाचा दंश घडवून मारण्याचा त्याचा कट तिला रुग्णालयात दाखल करावे लागल्याने मार्च 2020 मध्ये फसला. त्यानंतर त्याने नागाचा वापर करून दोन महिन्यांनी हाच प्रयोग सत्यात उतरवला. तिला सापाचा पहिला दंश झाल्यावर ती जवळपास 50 दिवस रुग्णालयात दाखल होती, असा दावा पोलिसांनी केला.

या पती पत्नीच्या नात्यात तणावाचे संबंध होते. हुंड्यासाठी तिचा सातत्याने छळ केला जात असल्याचा आरोप उथराच्या आई वडिलांनी केला. कोल्लम पोलिसांच्या गुन्हे शाखेने 1 हजार पानी आरोपपत्र दाखल केले. त्यात सूरजने ही हत्या कशी घडवली त्याचा तपशील दिला. तसेच शास्त्रीय आणि परिस्थितीजन्य पुरावे सादर केले.