खासदार अमोल कोल्हे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी
पुणे: राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यात जमा असून, या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून विविध निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तसेच, करोना काळात बंद करण्यात आलेल्या इतर बाबी देखील पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली जात आहे. राज्यभरातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे हे देखील पुन्हा सुरू होत असून, याबाबतची कार्यपद्धती व नियमांचा अध्यादेश शासनाकडून जारी करण्यात आला आहे. याचसंदर्भात खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे.
राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. राज्यातील चित्रपटगृहं १०० टक्के क्षमतेने सुरु करा, अशी मागणी त्यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे. येत्या २१ ऑक्टोबरपासून सरकारने ५० टक्के क्षमतेने नाट्यगृह सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. परंतु राज्य सरकारने हा निर्णय मागे घेऊन राज्यातील सिनेमागृहं १०० टक्के क्षमतेने सुरु करावेत. कारण करोना काळातल्या लॉकडाऊनमुळे आणि शूटिंग्ज बंद असल्याने अगोदरच कलाकारांची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यामुळे राज्यातील थिएटर्स १०० टक्के क्षमतेने सुरु करुन कलाकारांना दिलासा द्यावा, अशी मागणी अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
Thanking @CMOMaharashtra for permitting the Theatres to be operational. However a little more relaxation in the SOP for the same is needed…(1/3) pic.twitter.com/LKQWYXMk6o
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) October 13, 2021
यासंदर्भात शासनाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबर २०२१ नंतर आरोग्याचे नियम पाळून खुले करण्यास परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा २५ सप्टेंबर २०२१ रोजी केलेली आहे. या घोषणेच्या अनुषंगाने करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नमूद केलेल्या प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करण्याच्या अधीन नाट्यगृहे नियंत्रित पध्दतीने सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्व निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. ही परवानगी देणयामागील शासनाचा हेतू विचारात घेऊन सर्व संबंधितांनी नाट्यगृहांचे परिचालान करोना संदर्भातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या कोणत्याही निर्बंधांचा भंग होणार नाही, अशा पध्दतीने करणे आवश्यक आहे. या मार्गदर्शक तत्वांचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.