उगीचच कुणाच्या मुलांचं नाव घेऊन त्यांचं करिअर का बरबाद करता; अजित पवारांचा संतप्त सवाल
मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जरंडेश्वर साखर कारखान्यावरून रान उठवले होते. या कारखान्यात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्या असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर केले आहेत. यावेळी एनसीबीने ड्रग्जप्रकरणी धाडी मारल्या होत्या. त्यावेळी एका बड्या नेत्याचा मुलगाही या ठिकाणी असल्याचं म्हटलं गेलं होतं. त्यात पार्थ पवारांचं नावही पुढे आलं होतं, असा सवाल अजितदादांना करण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, जे काही असेल ते तपासा. उगीचच कुणाच्या मुलांचं नाव घेऊन त्यांचं करिअर का बरबाद करता. काही असेल तर त्याला शिक्षा करा. तुमच्या घरातला असो माझ्या घरातला असेल किंवा इतरांच्या घरातला असेल. नियम कायदा सर्वाना समान असतो, असतो का नसतो? असा सवालच अजितदादांनी केला.
तसेच मुंबईत ड्रग्जप्रकरणी धाडी टाकण्यात आल्या त्यावेळी कुणी तरी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोशल मीडियावर फोटो व्हायरल केला होता. त्यावर अजित पवार यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. एकाने तर माझाच फोटो सोसल मीडियावर व्हायरल केला. मला संपूर्ण राज्य ओळखतं. तरीही माझा फोटो व्हायरल केला. फोटो व्हायरल करणाऱ्याला लाज, लज्जा, शरम आहे की नाही?, असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला.
किरीट सोमय्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या मुद्द्यावरुन अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य केले होते. या आरोपांना अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात माझ्या नातेवाईकांवर आरोप केले जात आहेत. मात्र, हे लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. जरंडेश्वर कारखाना सर्वप्रथम मुंबईस्थित गुरु कम्युनिटी कंपनीने विकत घेतला होता. त्यानंतर हा कारखाना बीव्हीजी समूहाच्या हणमंत गायकवाड यांनी विकत घेतला होता. त्यासाठी हणमंत गायकवाड यांनी जरंडेश्वर शुगर लिमिटेड ही स्वतंत्र कंपनी स्थापन केली होती. मात्र, तोटा झाल्याने त्यांनी हा कारखाना दुसऱ्या कंपनीला विकून टाकल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.