बाबासाहेब पुरंदरे आपल्यात नसले तरी ते इतिहासाच्या प्रत्येक पानावर – संजय राऊत
मुंबई: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पुण्यात वयाच्या १०० व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना बाबासाहेब पुरंदरे आपल्यात नसले तरी ते इतिहासाच्या प्रत्येक पानावर आढळतील. इतिहास कसा सांगावा, लोकांपर्यंत इतिहास कसा पोहचवावा त्याचा ते आदर्श परिपाठ होते, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली.
संजय राऊत यांनी माध्यमांशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर भाष्य केलं. “७०-७५ दशकं त्यांनी महाराष्ट्रामध्ये, जो इतिहास पडद्यामागे होता, जो इतिहास लोकांपर्यंत पोहोचला नव्हता, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य जगात पोहोचलं नव्हतं, ते त्यांनी त्यांच्या वाणीतून, लेखणीतून आणि नाट्यकृतीतून जाणता राजा हे जगभरात पोहोचवलं. बाबासाहेब पुरंदरे हे फक्त शिवशाहीर नव्हते.
तर महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतक जीवनाचे अविभाज्य अंग होते. प्रत्येकाच्या कुटुंबात त्यांना कुठल्या ना कुठल्या रुपांनं स्थान होतं. शिवसेना परिवाराशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. खासकरुन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, ठाकरे कुटुंबीयांशी त्यांचा घरोबा होता,” असं संजय राऊत म्हणाले.
“जरी बाबासाहेब आपल्यात नसले तरी इतिहासाच्या पानापानावरती ते आढळतील. इतिहास कसा सांगावा?, इतिहास लोकांपर्यंत कसा पोहचवावा? त्याचा ते आदर्श परिपाठ होते,” असं संजय राऊत म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणास्तव इस्पितळात आहेत. त्यांच्याशी सकाळी बोलणं झालं त्यांनी सांगितलं, शिवसेना परिवाराच्या वतिनं आणि आपल्या सर्वांच्यावतिनं त्यांना श्रद्धांजली वाहुया,” असं संजय राऊत यांनी सांगितलं. तसंच, बाबासाहेब अमर आहेत, अमर राहतील, असं राऊत म्हणाले.