घराघरात शिवचरित्र पोहचविणारे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात निधन

पुणे: पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज (15 नोव्हेंबर) पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील तीन दिवसापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज पहाटे 5 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांचं एक पथक हे त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होऊन होते. मात्र, कालपासूनच ते उपचारांना साथ देत नव्हते.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचे पार्थिव सकाळी 8. 30 वाजता पुण्यातील (Pune) पर्वती येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येईल. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता वैकुंठ स्मशानभूमीस येथे अंत्यसंस्कार केले जातील.

बाबासाहेब पुरंदरे यांनी नुकतीच वयाची शंभरी गाठली होती. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित एक विशेष कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, मागील तीन दिवसांपासून अचानक बाबासाहेबांच्या प्रकृती बिघडली आणि त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, वार्धाक्यामुळे ते उपचारांना अपेक्षित असा प्रतिसाद देत नव्हते. आपल्या ओघवत्या वाणीने महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात शिवचरित्र पोहचविणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी 29 जुलै रोजी 100 व्या वर्षात पदार्पण केलं होतं. मात्र, आज त्यांच्या निधनाने शिवछत्रपतींचा चालता-बोलता इतिहास हा काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

कोण आहेत बाबासाहेब पुरंदरे?

बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे हे मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि वक्ते आहेत. सुरुवातीच्या काळात बाबासाहेब पुरंदरे पुण्यातच स्थायिक झाले आणि भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेत काम करू लागले. या ठिकाणीच इतिहाससंशोधक खरे हे बाबासाहेबांना गुरू म्हणून लाभले. त्यानंतर इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली. बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर 2015 सालापर्यंत 12 हजारांहून अधिक व्याख्याने दिलीत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केलाय. 29 जुलै 1922 रोजी बाबासाहेबांचा जन्म झालाय, तर 14 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांचं निधन झालंय.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!