अमरावती हिंसाचारः भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडेंसह महापौर गावंडेही अटक

मुंबई: त्रिपुरा येथील हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी निघालेल्या रॅलीला हिंसक वळण लागले होते. याचे पडसाद दुसऱ्या दिवशीही अमरावतीत दिसून आले. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि जोडफोड करण्यात आली. त्यामुळे जवळपास दोन दिवस अमरावती शहरात प्रचंड दहशतीचं वातावरण होतं.
हा जनक्षोभ उसळवण्यासाठी जबाबदार असलेल्या भाजप नेत्यांची पोलिसांकडून झाडाझडती घेतली जात आहे. काही जणांना अटकही करण्यात आली आहे. आतापर्यंत दोन्ही गटातील जवळपास ९० जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडेंसह महापौर चेतन गावंडे आणि भाजपचे सभागृह नेते तुषार भारतीय यांचाही समावेश असून त्यांनाही अटक करण्यात आली आहे.
दरम्यान अमरावती पोलीस आता अॅक्शन मोडमध्ये आले असून शहर कोतवाली पोलिसांनी त्याप्रकरणी दोन्ही गटातील जमावाविरुद्ध जाळपोळ, दगडफेकप्रकरणी दोन गुन्हे दाखल केले आहेत. तर खोलापुरीगेट ठाण्याच्या हद्दीत दुपारी साडेबारानंतर छत्रपुरी खिडकी परिसरात तीन व्यापारी प्रतिष्ठानांना काही उपद्रवींनी लक्ष केले.
बंद प्रतिष्ठाने फोडून जवळपास सात लाखांचा ऐवज लुटल्या गेला, असे खोलापुरीगेट पोलिसांनी सांगितले. त्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गटातून पोलिसांनी ९० जणांना बेड्या घातल्या आहेत. पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजपचे महापौर चेतन गावंडे यांना अटक केली आहे. तसेच भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे आणि सभागृह नेते तुषार भारतीय यांना अटक केली आहे. याबाबतचे साम टीव्हीने वृत्त दिले आहे.