न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा विजय, मालिकाही जिंकली

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-20 सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकत भारताने न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना काल कोलकाता येथील ऐतिहासिक स्टेडियम ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला घेतला होता.
प्रथम फलंदाजी करत भारताने 184 धावांचा डोंगर उभा केला होता. त्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या न्यूझीलंला केवळ 111 धावांपर्यंत मजल मारला आली. त्यामुळे भारताना हा सामना 73 धावांनी जिंकला आहे. या विजयासह भारताने मालिका खिशात घातली आहे.
185 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या दोन षटकात किवी संघाने 21 धावा जमवल्या होत्या. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतराने एकेका फलंदाजाला बाद करत सामन्यावर पकड निर्माण केली. न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलने एका बाजूने बराच वेळ संघर्ष केला खरा मात्र त्याला दुसऱ्या कोणत्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही. गप्टिलने 36 चेंडूत 51 धावांची अर्धशतकी खेळी केली.
अक्सर पटेलने डॅरेल मिचेलला बाद करत भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्यानेच दुसरी आणि तिसरी विकेट घेत सामना भारताच्या बाजूने झुकवला. त्यानंतर इतर गोलंदाजांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली. अक्सर पटेलने 3 षटकात 9 धावा देत 3 बळी घेतले. तसेच हर्षल पटेलने 2 बळी घेतले. दीपक चाहर, वेंकटेश अय्यर आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी एक विकेट घेतली. तसेच इशान किशनने दोन फलंदाजांना धावबाद करत त्याच्यातील क्षेत्ररक्षणाचे उत्कृष्ट गुण दाखवले.