शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी; सोयाबीनचा दर तब्बल ‘इतक्या’ रुपयांवर जाणार!

रिसोड: प्रतिनिधी शंकर सदार/ खरिप हंगामात कापूस व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. खरिपातील मुख्य पिकांना दर मिळाला नाही तर शेतकऱ्यांचे अर्थकारण धोक्यात येते. कारण उत्पादनावर शेतकऱ्यांनी एकरी हजारो रुपये खर्ची केलेले असतात. मात्र, आता या दोन्ही पिकांच्या दरात दिवसाकाठी वाढ होत आहे. दोन्ही पिकांची दरवाढीची स्थितीही एकसारखीच असून या पिकांचाच शेतकऱ्यांना आता हातभार लागणार आहे.

दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात सुरु झालेली वाढ अद्यापही कायम आहे. दिवसाला 150 ते 200 रुपयांची वाढ ही ठरलेलीच आहे. आज  कृषी उत्पन बाजार समिती रिसोड मध्ये सोयाबीनला 6820 रुपये क्विंटलला दर मिळाला आहे. यापूर्वी मुहूर्ताच्या सोयाबीनलाच असा दर मिळाला होता. मात्र, त्यानंतर सोयाबीनचे दर झपाट्याने घटले होते. अशा प्रतिकूल परस्थितीमध्येही शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक करण्यावर भर दिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे अधिकचे नुकसान झाले नाही तर आता दर वाढल्याने शेतकऱ्यांचा संयम कामी आला आहे.

कापूस व सोयाबीनला बाजारात मोठी मागणी आहे. मात्र दिवाळीनंतर कापसाच्या दरावरुन अफवा पसरु लागल्या होत्या. कापसाची निर्यात बंद करुन आयात केली जाणार तसेच वाढत्या दरामध्ये सरकार हस्तक्षेप करुन दर कमी करणार असल्याचा अफवा होत्या त्याच प्रमाणे सोयाबीनबाबत ही झाले होते. दर वाढले की आता सोयापेंडची आयात केली जाणार असल्याची अफवा पसरवली जात होती. मात्र, ऑगस्टनंतर पुन्हा सोयापेंडची आयात केलेली नाही. त्यामुळे सोयाबीनच्याही दरावर काही परिणाम होणार नाही.

कापूस आणि सोयाबीनच्या दरामध्ये दिवसाकाठी वाढ होत असून बाजारपेठेत मागणीही कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही पिके विक्रीची गडबड न करता टप्प्याटप्प्याने विक्री करणे आवश्यक आहे. अन्यथा आवक अधिक झाली की त्याचा परिणाम हा दरावर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गरज निर्माण झाल्यावरच विक्री करणे फायद्याचे राहणार आहे. कापसाला ८ हजार तर सोयाबीनला ७ हजाराचा दर मिळत आहे. हे दर कायम ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने मालाची विक्री करावी.