पुण्यात विदेशी फटाक्यांच्या विक्रीवर बंदी; फटाके विक्रीसाठी परवाना आवश्यक

29

पुणे: कोरोनानंतर पहिल्यांदाच साजऱ्या होणाऱ्या दिवाळसणाला पुणेकरांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कारण, पोलीस प्रशासनाकडून पुण्यात विदेशी फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, दिवाळीनिमित्त तात्पुरते फटाके विक्रीसाठी पोलिसांकडून परवाने वितरीत करण्यात येतील.

27 ऑक्‍टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीसाठी हे परवाने ग्राह्य असतील. मात्र, या कालावधीतही विक्रेत्यांना विदेशी फटाक्‍यांची विक्री करता येणार नाही.तसेच रस्त्यापासून 10 मीटर अंतराच्या आत कोणत्याही प्रकराचे फटाके अथवा शोभेची दारू उडविण्यास बंदी असेल. त्यामुळे आता या निर्णयावर फटाक्यांचे व्यापारी आणि पुणेकरांमध्ये काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहावे लागेल.

काही दिवसांपूर्वीच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली होती. त्यानंतर पुण्यातील कोरोना निर्बंध बऱ्याच अंशी शिथील करण्यात आले होते. कोरोना प्रमाण कमी झाल्यानं दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी परवानगीची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी परवानगी देण्यात आली होती. याशिवाय ग्रामीण आणि शहरी भागातील आठवडी बाजार सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते.

गेल्यावर्षी संपूर्ण राज्यात दिवाळीच्या काळात फटाक्यांवर बंदी घालण्यात आली होती. फटाक्यांची आतषबाजी करु नये. फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे कोरोनाचं संक्रमन वाढण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडणे टाळावे. त्याऐवजी दिव्यांचा आरास मोठ्या प्रमाणात करुन उत्सव साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आले होते.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.