काँग्रेस पक्ष स्वत:ची मतं राखता आली नाहीत ते उद्या राज्याचं नेतृत्त्व काय करणार – प्रवीण दरेकर

मुंबई: विधानपरिषद निवडणुकीत महाविकासआघाडीला नागपूर आणि अकोला-वाशिमची जागा राखता आली नाही. या निवडणुकीत त्यांची मतंही फुटली. त्यामुळे ज्यांना स्वत:च्या जागा आणि पक्षाची मतं राखता आली नाहीत, ते उद्या राज्याचे नेतृत्व काय करणार, अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली.

नागपूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत नाना पटोले यांचा एककल्ली कारभार दिसून आला. त्यांनी दबाव आणून ऐनवेळी उमेदवार बदलायला लावले. त्याचे पडसाद निवडणुकीत उमटले. त्यामुळे आता नाना पटोले यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी होत असेल तर त्यामध्ये काहीही गैर नसल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले.

नागपूर आणि अकोला-वाशिम विधानपरिषद मतदारसंघाचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या दोन्ही जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवत महाविकासआघाडीला धक्का दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात राज्य सरकार कारभार करण्यात अपयशी ठरले आहे. अकोला आणि नागपूर विधानपरिषद निवडणुकीच्यानिमित्ताने जनतेने हे दाखवून दिले. नागपूरमध्ये काँग्रेसची 40 ते 45 मते फुटली. नागपूरमध्ये भाजपचा जवळपास 176 तर अकोल्यात 186 मतांनी विजय झाला. ग्रामपंचायत निवडणुकांपासून राज्यात भाजपचा अश्वमेध घोडदौड करत असल्याचे दरेकर यांनी म्हटले.