गारपीट आणि अवकाळी पावसाने 12 जिल्ह्यांना झोडपले, बळीराजा हवालदिल

मुंबई: महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात आला आहे. मंगळवारी गारपीठ आणि अवकाळी पावसाने मराठवाडा  आणि विदर्भातील  12 जिल्ह्यांना झोडपून काढले. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे तर मोठे नुकसान झालेच आहे त्यासोबत घरांचे आणि पशुधनाचे देखील नुकसान झाले आहे. आधीच संकटात असलेला बळीराज पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे. विदर्भात अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू  झाला आहे.

विदर्भातील अकोला, वाशिम ,बुलडाणा, नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया , यवतमाळ  या जिल्ह्यांना गारपीठ आणि अवकाळी पावासाने झोडपून काढले आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यातील औरंगाबाद , जालना  आणि उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिठीचा तडाखा बसला आहे. याठिकाणी बोराच्या आकारांच्या गारा पडल्या. या भागातील शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातीत पीक, झाडं जमीनदोस्त झाली आहेत.

धामनगाव रेल्वे आणि भंडारा  जिल्ह्यासह आणखी एका ठिकाणी वीज कोसळून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एका ठिकाणी वीज कोसळून 25 बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अवकाळी आणि गारपिठीमुळे तुरीसह रब्बी हंगामातील हरभरा आणि अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजीपाला आणि फळ पिकांचे देखील नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यात पावसामुळे सोयाबीन भिजले. मका, गहू आणि कांदा या पिकांचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे.