यंदाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई: राज्याचे विधिमंडळ हिवाळी अधिवेशन हे नागपूरला होणार असल्याची चर्चा होती. पण ठाकरे सरकारनं हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचं नियोजन केल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळतेय. तसेच विधिमंडळ हिवाळी अधिवेशन येत्या 22 ते 28 डिसेंबरला मुंबईत करण्याचं राज्य सरकारचं नियोजन असून, सोमवारी संसदीय कामकाज समितीची बैठक होणार आहे, त्यातच या तारखांवर अधिकृत शिक्कामोर्तब होणार असल्याचं बोललं जातंय.
कोरोनाची येऊ घातलेली संभाव्य तिसरी लाट, विधान परिषद निवडणूक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया या तीन कारणास्तव राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर पडल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान आता 22 ते 28 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार असल्याची माहिती मिळालीय. हिवाळी अधिवेशन हे प्रथा आणि परंपरेनुसार दरवर्षी नागपूरला होतं, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर झालेल्या शस्त्रक्रियेच्या कारणास्तव ते मुंबईत घेण्याचे नियोजन आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीलाही अधिवेशन मुंबईत हवे आहे, पण भाजप हिवाळी अधिवेशन नागपुरात व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे.
यंदाचे हिवाळी अधिवेशन कोरोना पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे त्यात सहभागी होणाऱ्या विधिमंडळ सदस्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यत लसीकरणाचे दोन डोस पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आलेय. त्यामुळे अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला आपल्यासोबत दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक आहे. विधिमंडळ परिसरात सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश दिला जाणार नाही.