महागाईचा भडका! सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ
मुंबई: सततच्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. या नाही तर त्या वस्तूंच्या किमतीत वाढ होत चालली आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण येत आहे. सध्या पेट्रोल-डिझेलचे दर गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहेत त्यामुळे सर्वसामान्यांना टेन्शन नव्हते. पण आता पेट्रोल-डिझेल नाही तर सीएनजी आणि पीएनजीच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. पाईपलाईनद्वारे घरोघरी पोहचणाऱ्या एलपीजी आणि वाहन इंधन सीएनजीच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे.
सीएनजी दरात किलोमागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीमध्ये कराचा समावेश आहे. हे नवे दर शनिवारी म्हणजेच आजपासून लागू झाले आहेत. सीएनजी व्यतिरिक्त एलपीजी पीएनजीच्या दरातही प्रति किलो दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या दर वाढीनुसार मुंबईमध्ये सीएनजी 63.50 रुपये प्रतिकिलोने मिळणार आहे.
दरवाढीनंतर मुंबईतील पीएनजीचे दर 38 रुपये प्रति युनिट झाला आहे. मुंबई महानगरमध्ये मागील 11 महिन्यांत सीएनजीच्या किमतीत 16 रुपये प्रति किलोने वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम महानगरातील आठ लाख ग्राहकांवर झाला आहे. आधीच महागाईमुळे मेटाकुटीला आलेल्या ग्राहकांना आता पुन्हा जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. मुंबईव्यतिरिक्त लखनऊ, उन्नाव आणि आग्रामध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. याठिकाणी सीएनजीसाठी 72.50 रुपये प्रति किलोसाठी द्यावे लागणार आहे. तर पीएनजीचे दर 38.50 रुपये प्रति युनिट झाले आहे.