तुकाराम सुपेंकडून आणखी 33 लाख रुपये जप्त, आतापर्यंत 3 कोटी 90 लाख रुपये जप्त

28

पुणे: टीईटी परीक्षा पेपरफुटीत अटक  करण्यात आलेल्या परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्याकडील घबाड संपता संपत नसल्याचं चित्र आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा निलंबित अध्यक्ष तुकाराम सुपेकडून आज आणखी 33 लाख रुपये जप्त केले आहेत. आतापर्यंत तुकाराम सुपेकडून पुणे पोलिसांनी तीन कोटी 90 लाख रुपयांची रोकड आणि दागिने जप्त केले आहेत. तुकाराम सुपेने हे पैसे 2018 आणि 2019 च्या टीईटी परीक्षेतील गैरव्यवहारातून जमा केले आहेत. पोलिसांची कारवाई सुरु झाल्यावर सुपेने हे पैसे त्याच्या वेगवेगळ्या नातेवाईकांच्या घरी दडवून ठेवले होते. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच सुपेने दडवलेले पैसै बाहेर येत आहेत.  तुकाराम सुपेची शिक्षण विभागातील कारकीर्द आधीपासूनच वादग्रस्त राहिली आहे.

22 तारखेला तुकाराम सुपेंकडे 10 लाखांची रोकड मिळाली होती. सुपेंनी ही रोकड जवळच्या व्यक्तीकडे ठेवायला दिली होती. तीच रोकड त्या व्यक्तिनं आज पोलिसांच्या स्वाधीन केली. त्याआधी सुपेच्या घरातून 1 कोटी 58 लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने हस्तगत केली होती. तर पहिल्या धाडीत पोलिसांनी 90 लाखांचं घबाड हस्तगत केलं होतं. पण पुन्हा पोलिसांचा छापा पडण्याच्या भीतीनं सुपेंच्या पत्नी आणि मेहुण्यानं रक्कम आणि दागिने दुसरीकडे लपवले होते. पण पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर रोख रकमेसह ऐवज पोलिसांच्या हाती लागले.

म्हाडा पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत असून इतर परीक्षांमधील घोटाळे बाहेर येत आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेतही पैसे घेऊन अनेकांना उत्तीर्ण करण्यात आल्याचे समोर आले आहे.  पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले होते की, दोन पेपरफुटीचे प्रकरणाचा तपास सुरू होता. म्हाडा पेपरफुटीचा तपास सुरू असताना टीईटीमध्ये गोंधळ असल्याचे दिसून आले. या प्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली. यामध्ये सुपे आणि सावरीकरचा समावेश आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.