म्हाडा पेपरफुटीचं औरंगाबाद कनेक्शन; तीन जणांना पुणे पोलिसांकडून अटक

पुणे: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात ‘म्हाडा’तील विविध पदांसाठी होत असलेली भरती परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली आहे. म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फुटला असून, या प्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई करत तीन जणांना अटक केली आहे. आरोग्य विभागातील क व ड संवर्गातील भरती परीक्षेच्या पेपरफुटीचा तपास करत असतानाच पोलिसांना म्हाडाच्या पेपरफुटीची माहिती मिळाली.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. “आरोग्य विभागाच्या ‘क’ आणि ‘ड’ वर्गाच्या पदाच्या परीक्षांच्या पेपर फुटीच्या तपासासाठी पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना आज 12 डिसेंबर होणाऱ्या म्हाडा च्या परीक्षेचे पेपर फोडण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यामध्ये गुंतलेल्या संशयितांबाबत पुणे शहर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती’, असं पोलीस आयुक्त गुप्ता म्हणाले.

‘मिळालेल्या माहितीच्या आधारे सायबर क्राईम विभागाचे पथके तयार करून त्यांना औरंगाबाद, जालना, बीड, पुणे, ठाणे परिसरामध्ये पाठवून संशयिताना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. औरंगाबाद परिसरातील परीक्षार्थींशी संपर्क साधून त्यांच्याकडून आर्थिक फायदा मिळवून परीक्षेच्या पूर्वी पेपर फोडून त्यांना देण्याची योजना टार्गेट करिअर पॉईंट या संस्थेचे संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडमीचे संचालक कृष्णा जाधव आणि इतरांनी आखल्याची माहिती समोर आली”, अशी माहिती पोलीस आयुक्त गुप्ता यांनी दिली.