काँग्रेसचा पुन्हा स्वबळाचा नारा, मुंबई महापालिकेच्या 236 जागांवर उमेदवार देणार – भाई जगताप

मुंबई: राज्यात शिवसेना, काँग्रेस  आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येत महाविकास आघाडीची स्थापना केली. मात्र येत्या महापालिका निवडणुकीसाठी तिन्ही पक्षांनी वेगळी भूमिका घेतल्याचे चित्र आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यानंतर आता मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे.

काँग्रेस स्थापना दिवसाच्या निमित्तानं मुंबई काँग्रेसच्यावतीनं आझाद मैदानात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. आज काँग्रेस 137 व्या वर्षात पदार्पण करत आहे. सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो, असेही ते म्हणाले. काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार आहे. हे मी सातत्याने सांगत आहे. काँग्रेस या निवडणुकीसाठी 236 जागांवर आपले उमेदवार देणार आहे. मुंबईत काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही जगताप म्हणाले.

महाविकास आघाडी सरकाराच्या अनेक अनेक गोष्टींमध्ये राज्यपालांकडून हस्तक्षेप केला जातो. हे योग्य नाही. हात दाखवून ओपन मतदान आपण घेऊ शकतो तर मागच्यावेळेस सुद्धा अशीच पद्धत अवलंबली होती मग या वेळेस काय झाले ? असा सवालही जगताप यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केला. येत्या काळात काँग्रेसचा विधानसभा अध्यक्ष असेल , असेही ते म्हणाले.

भाई जगताप आणि शिवसेनेचे रामदास कदम यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ संपला.यादरम्यान निवृत्त होणारे सदस्य यांचा सभापती, उपसभापती यांच्या सोबत फोटो काढण्यात आला होता.यावेळी दोन्ही नेते गैरहजर असल्याने उलट -सुलट चर्चा रंगल्या होत्या. त्यासंदर्भात विचारलं असता भाई जगताप यांनी यावर भाष्य करणे टाळले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!