शरद पवारांचा इतिहासच खोटं बोलण्याचा; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका
मुंबई: राज्यात सध्या तीन मोठ्या राजकीय मुद्द्यांवरून राजकारण चांगलेच गाजत आहे. त्यात नारायण राणे विरुद्ध ठाकरे संघर्षाने याची सुरूवात झाली. त्यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील लेटर वॉरने वातावरण तापवले आणि आता ऐन थंडीच्या दिवसात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या ऐतिहासिक पाहटेच्या शपथविधीवरून पुन्हा राजकारणाचे निखारे पेटले आहेत.
शरद पवारांनी आजपर्यंत त्यावर खुली प्रतिक्रिया दिली नव्हती, मात्र शरद पवार बोलले आणि दुसरीकडून भाजप नेतेही सुरू झाले. शरद पवारांच्या याच वक्तव्यावरून चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना काही तिखट सवाल विचारत पवारांचा इतिहासच खोटं बोलण्याचा आहे, अशी टीका केली आहे.
मोदींनी शरद पवारांना कोणती ऑफर दिली होती? शरद पवार आणि मोदी यांच्या चर्चेत काय शिजलं? असे चंद्रकांत पाटलांना विचारले असता, नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा झाली माहिती नाही, कारण मी एक सामान्य कार्यकर्ता आहे काळाच्या ओघात हे सगळं बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिली आहे. त्यामुळे पवार मोदी भेटेत काय झालं कुणी कुणाला काय ऑफर दिली? हे मात्र उद्याप कोणीही सांगताना दिसून येत नाही.