अष्टविनायक तीर्थक्षेत्रस्थळी पायाभूत विकासाची कामे वेळेत पूर्ण करावीत – डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई: अष्टविनायक तीर्थक्षेत्र स्थळांच्या सर्वांगीण विकासाच्या आराखड्याची अंमलबजावणी कालमर्यादेत, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावीत. भाविकांना वेळेत योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध होतील अशा प्रकारे ही कामे करण्यात यावीत, तसेच जी कामे सुरू आहेत त्याबाबतचा अहवाल पंधरा दिवसात सादर करावा अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

अष्टविनायक तीर्थक्षेत्र स्थळांच्या सर्वांगीण विकासाच्या आराखडाच्या अंमलबजावणीविषयी दूरदृश्य प्रणालीव्दारे आयोजित बैठकीत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या. या बैठकीस अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील. अष्टविनायक गावांचे सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.

उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, देवस्थानच्या ठिकाणी अपुरी कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. छोटी- छोटी कामे करण्यासाठी स्थानिक पातळीवर निधी उपलब्ध करून कामे करावी. देवस्थान स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर व मंदिर परिसरात पेस्ट कंट्रोल करण्यात यावे. उपलब्ध निधी खर्च करण्यासाठी योग्य व्यवस्थापन करावे. निर्माल्यासाठी व्यवस्थित नियोजन करण्यात यावे. स्वच्छता, लाईट, पाणी यादी सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात यावे. भाविक कोणत्या जिल्ह्यातून, राज्यातून येतात याची माहिती जमा करावी जेणेकरून निवासस्थानासह सोई -सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल, असेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ११ ते १३ डिसेंबर २०२१ या कालावधीत अष्टविनायक तीर्थक्षेत्राचा दौरा केला. अष्टविनायक तीर्थक्षेत्रांकडे जाणारे काही रस्ते दुरुस्ती करणे आवश्यक आहेत, लांबच्या रस्त्यावर दोन तासाच्या प्रवासादरम्यानच्या अंतरावर सार्वजनिक शौचालय असणे गरजेचे आहे, ज्या देवस्थानच्या जवळ तलाव आहेत, तो परिसर सुशोभित करावा. रस्त्यावर विविध सुविधा उपलब्ध असणारे दिशादर्शक बोर्ड लावणे, सर्व ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी ग्रामपंचायतींने दक्ष असावे, शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी पाणी पुरवठा विभागांने लक्ष द्यावे, अन्नछत्र, प्रसाद या विषयी मंदिर समितीने नियमित प्रमाण ठरवावे, मंदिरात ठराविक वेळेत दर्शन बंद करून दर्शन ठिकाणी आणि मंदिर परिसरात निर्जंतुकीकरण करावे, अशा विविध सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिल्या.

यावेळी मोरगाव, थेऊर, सिध्दटेक, महड, पाली, ओझर, लेण्याद्री व रांजणगाव या अष्टविनायक देवस्थान पदाधिकारी यांनी विविध समस्या व अधिकच्या सुविधा विकसित करण्याविषयी माहिती दिली. सबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभागांचे अधिकारी, मुख्याधिकारी यांनी सुरू असलेल्या विकासकामासंबधी माहिती दिली.