अमरावती मधील बोरगाव धर्माळे येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ संपन्न

107

अमरावती : केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शुक्रवारी अमरावती मधील बोरगाव धर्माळे येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यात्रेचा शुभारंभ केला. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या विकासाला नेहमीच प्राधान्य असते. त्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध लोकोपयोगी योजनांचा कोट्यवधी भारतीयांना लाभ होत आहे. त्यांचे अनुभव आणि मोदीजींचे काम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा या मागचा उद्देश आहे. त्यामुळे यामध्ये जनसहभाग वाढवावा, अशी अपेक्षा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी लाभार्थ्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आयुष्यमान भारत गोल्ड कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच गावाला शंभर टक्के ‘हर घर जल’ घोषित झाल्याबाबत प्रमाणपत्र देऊन सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमस्थळी आरोग्य तपासणीसह विविध विभागांचे माहिती  देणारे स्टॉल लावण्यात आले होते. नागरिकांनी या स्टॉल्सला भेटी देऊन आरोग्य तपासणीसह विविध योजनांचा लाभ घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारत बनविण्याचा संकल्प संदेश सर्व मान्यवर व नागरिकांनी ऐकला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी संकल्प शपथ घेतली.
विकसित भारत संकल्प यात्रा मोहिम यात्रेच्या माध्यमातून ग्रामस्वराज्य अभियान राबविले जाणार असून, अद्यापपर्यंत ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून राबविण्यात येत आहे. या यात्रेसाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजनाची सविस्तर माहिती असलेले चित्ररथाद्वारे जिल्ह्यातील नगरपालिका, नगर परिषद क्षेत्र आणि विविध ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये केंद्र शासनाच्या विविध योजनांची व्यापक प्रचार-प्रसिद्धी केली जाणार आहे. नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
यावेळी खा. अनिल बोंडे, आ. प्रवीण पोटे पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्यासह इतर मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.