कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठ येथे सिद्धगिरी संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाच्या पूर्वतयारीचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. या महोत्सवासाठी उभारण्यात आलेल्या विविध दालनांना भेट देऊन कार्यक्रमाच्या तयारीसंदर्भात त्यांनी माहिती घेतली.
जागतिक स्तरावर वातावरणीय बदलांमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाच्या जबाबदारीची जाणीव सर्वसामान्य लोकांना व्हावी यासाठी श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने दिनांक २० ते २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत कणेरी मठ येथे होत असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात पर्यावरण संवर्धनाचा जागर होत असून यामध्ये सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी केले.
कणेरी मठ येथे आयोजित करण्यात येत असलेल्या या महोत्सवात पंचमहाभूतांवर आधारित विविध दालनांची निर्मिती करण्यात आली असून या दालनांची पाहणी करून त्यामागची भूमिका जाणून घेतली. श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थानच्या वतीने करण्यात येत असलेल्या पर्यावरण पूरक सेंद्रिय शेतीची पाहणी केली तसेच सेंद्रिय शेती हीच भविष्याची गरज असून तिला प्रोत्साहन देण्यासाठी
सर्व प्रकारची मदत करण्यात येईल असेही यासमयी बोलताना त्यांनी स्पष्ट केले.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलो असल्याने शेतकऱ्यांप्रमाणेच सहकाऱ्यांच्या साथीने वनभोजनाचा आनंद घेतला. सिद्धगिरी गुरुकुल येथे भेट देऊन तिथे मुलांना देण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण शिक्षणपद्धतीबद्दल माहिती जाणून घेतली. तसेच मठातील गोशाळेला भेट देऊन वेगवेगळ्या देशी गायीचे संगोपन कसे केले जाते याबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतले.
याप्रसंगी कणेरी मठाचे प्रमुख श्री काडसिध्देश्वर स्वामीजी, पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक, विभागीय आयुक्त सौरभ राव, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, माजी आमदार अमल महाडिक, मठाचे विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील उपस्थित होते.