भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ; छाप्यात टेम्पो भरून कागदपत्र जप्त
पुणे: जळगावला गिरीश महाजन यांच्याशी संबंधित गुन्ह्याच्या तपासासाठी गेलेल्या पथकाकडून एक टेम्पो भरून कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली. जळगावमधील एक शैक्षणिक संस्था ताब्यात घेण्यासाठी संस्थेच्या संचालकाचे अपहरण आणि खंडणीप्रकरणी कोथरुड पोलिस ठाण्यात गेल्या वर्षी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह 29 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
ऍड.विजय पाटील (वय 52) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात जानेवारी 2021 मध्ये फिर्याद दिली होती. त्यावरुन गिरीश दत्तात्रेय महाजन (रा. जामनेर, जळगाव), तानाजी भोईटे (रा. कोंढवा), नीलेश भोईटे, वीरेंद्र भोईटे (रा. भोईटेनगर जळगाव) यांच्यासह 29 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
पाटील हे जळगावमधील जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित शैक्षणिक संस्थेचे संचालक आहेत. संबंधित संस्था महाजन यांना पाहिजे होती, त्यासाठी त्यांनी पाटील यांना एक कोटी रुपये देण्याचे आमिष दाखविले. मात्र, पाटील यांनी त्यास नकार दिला.
दरम्यान, संशयित आरोपींनी पाटील यांना संस्थेसंबंधी कागदपत्रे देण्याचा बहाणा करून पुण्यात बोलावले. त्यांना खंडणी मागितली, पुण्यात आल्यानंतर त्यांना शिवीगाळ करत दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसंच त्यांना गाडीत जबरदस्तीने बसवत सदाशिव पेठेत असलेल्या एका फ्लॅटवर नेले. त्या ठिकाणी मारहाण करत गळ्याला आणि पोटाला चाकू लावला. फिर्यादी यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीलाही त्यांनी याठिकाणी डांबलं असल्याचे आरोप करण्यात आले होते.