उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, योगी आदित्यनाथ गोरखपूर शहरमधून लढणार

16

दिल्ली: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 10 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  गोरखपूर विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अयोध्येतून निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. मात्र, त्यांना गोरखपूर येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यात 57 उमेदवारांची तर दुसऱ्या टप्प्यात 38 मतदार संघातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर मतदार संघातून निवडणूक लढणार आहे. तर केशव मोर्या हे सीराथू विधानसभा मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरतील.

दरम्यान, या आधी काँग्रेस, समाजवादी पक्ष-राष्ट्रीय लोक दलाच्या आघाडीने आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तरप्रदेशातील 10 जिल्ह्यातील 58 जागांसाठी 10 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सपा-रालोद आघाडीने गुरुवारी आपल्या 29 उमेदवारांची यादी जाहीर केली. तर काँग्रेसने 125 उमेदवारांची यादी जाहीर केली. काँग्रेसने 50 महिलांना उमेदवारी दिली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.