…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे सूचक विधान

7

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. उद्धव ठाकरे यांनी भाजपवरही टीकेचे बाण डागले. देशात गुलामगिरीचं वातावरण तयार केलं जात असून, गाढवं किंवा काही जनावरं वाघाचं कातडं पांघरतात, तसंच यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलंय,’ असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘सुरूवातीच्या काळामध्ये जेव्हा बाबरी पाडली होती. त्या वेळी सर्वजण पळाले होते. हे मी वारंवार सांगतोय, कारण आता नवीन पिढी आली आहे. नव हिंदुत्वावाद्यांकडेही नवी पिढी आली आहे. त्यांना असं वाटतंय की, आपणच एकटे हिंदुत्वाचे शिलेदार आहोत. हे सगळे भंपक आहेत. पण बाबरी पाडल्यानंतर ‘गर्व से कहो हम हिंदू है’ आणि ‘बाबरी पाडलेल्यांचा मला अभिमान आहे’, असं बाळासाहेब म्हणाले होते. तेव्हा शिवसेनेची देशभर लाट उसळली होती. तेव्हा जर आपण महाराष्ट्रबाहेर सीमोल्लोंघन केलं असत, तर न जाणो आज शिवसेनेचा पंतप्रधान दिल्लीत दिसला असता. एवढी प्रचंड लाट त्यावेळी होती,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपला फटकारे लगावले. ‘त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी काय विचार केला. तुम्ही हिंदुत्वावादी आहात ना… तुम्ही देश सांभाळा, आम्ही महाराष्ट्र सांभाळतो. तिकडेच आपलं घोडं अडलं. कारण आपण विश्वास टाकला आणि त्यांनी विश्वासघात केला. त्यांनी दिल्ली आपल्या पद्धतीने जिंकलीच, पण आता आपल्या घरात घुसून आपल्याच नामशेष करायच्या मागे लागल्यानंतर उलटा पंजा मारावा लागणार होता, तो मारला. आपली फसवणूक केली.

आम्ही झोकून देऊन तुमचा प्रचार केला. मला बोलवल्यानंतर मी सुद्धा मोदीजींचा अर्ज भरण्यासाठी अर्ध्यारात्री पोहोचलो. अमित शाहांचा अर्ज भरायला गेलो. आमचा चेहरा वापर केल्याचं ते म्हणताहेत, मग माझाही वापर करून तुम्ही जिंकलात, असं आम्ही म्हणू शकतो. कशाला हवा होतो मी तिकडे. आग्रह करून बोलवलं होतं आणि मी गेलो होतो. पण, जिंकल्यानंतर वापरा आणि फेकून द्या,’ अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

‘आज एनडीएमध्ये आता फार काही पूर्वीची लोकं राहिलेली नाही. पूर्वीची एनडीए तर आता शिल्लकच राहिलेली नाहीये. सर्वांना घेऊन तुम्ही जिंकले आणि एकटेच वरती जाऊन बसले. हे काही हिंदुत्व असू शकत नाही. हिंदुत्वासाठी सत्ता हवी होती, सत्तेसाठी आपण हिंदुत्वाचा वापर कधी केला नाही, कधीही करणार नाही, वापर शिवसेनाच कधीच करणार नाही’, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.