…. तर बाळासाहेबांनी त्यांना 5 फूट जमिनीत गाडलं असत; सामनाच्या अग्रलेखातून विरोधकांवर हल्लाबोल

मुंबई: शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचं आज नवनं पुण्यस्मरण. आजचा सामनाचा अग्रलेख हा याच विषयाशी संबंधीत आहे. बाळासाहेब आज असते तर त्यांनी काय केलं असतं याचा ऊहापोह अग्रलेखात करण्यात आला आहे. त्याच अनुषंगानं विरोधक तसच स्वातंत्र्य भीकेत मिळालं म्हणणाऱ्यांवर अक्षरश: शब्दांचा चाबूक चालवलाय. अमरावतीच्या दंगलीपासून ते गुजरात दंगल आणि त्यातून हिंदुत्व नेमकं कोणतं खरं हे ठासून सांगण्याचा प्रयत्न केला गेलाय.

सामनाचा अग्रलेख म्हणतो, महाराष्ट्र मजबूत राहिला तर देशाचा डोलारा भक्कम राहील हेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे धोरण होते. त्याच धोरणाचे तोरण ते बांधत राहिले. हिंदू राष्ट्राची कल्पना त्यांनी मांडली, पण त्यांनी हिंदूंना सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली.

मातृभूमीला वंदन करणारा, प्रत्येक धर्मीय आपला, देशाचा असे ठासून सांगितले. विस्कळीत विचारांचे हिंदुत्व एका अवाढव्य ढिगाऱ्याप्रमाणे पडले होते. त्या अवाढव्य ढिगाऱ्याला शिवसेनाप्रमुखांनी एका वास्तूचे रुप दिले. त्या वास्तूत शिरलेले नेभळट आज शिवसेनेवर, हिंदुत्वावर लेक्चर देतात. तेव्हा लोक म्हणतात, आज बाळासाहेब हवेच होते.

अभिनेत्री कंगना रणावतने स्वातंत्र्य हे भीकेत मिळाल्याचं वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावर वाद उठलेला असतानाच अभिनेते विक्रम गोखले यांनी त्याचं समर्थन केलं. अवधूत गुप्तेसारखे गायकही अप्रत्यक्षपणे गोखलेंच्या बाजूनं उभे राहिले. ह्या सर्वांचा समाचार घेताना अग्रलेख म्हणतो- स्वातंत्र्याची नवी व्यवस्था, नवी व्याख्या, नवा इतिहास रचला जात आहे. 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक आहे.

खऱे स्वातंत्र्य 2014 साली मिळाल्याचा साक्षात्कार काही गांजाड्यांना झाला आहे. त्याच गांजाड्यांनी फेकलेल्या चिलमीच्या थोटकांचा झुरका मारुन महाराष्ट्रातील काही भिकारडे लोक, होय होय, 1947 पर्यंतचा स्वातंत्र्यलढा, क्रांतिकारी हा बकवास आणि भिकाऱ्यांचे आंदोलन होते, असे त्याच तारेत बरळू लागले आहेत. लोकमान्य टिळकांपासून ते वीर सावरकरांपर्यंत, सरदार पटेलांपासून ते नेताजी सुभाषचंद्र बोसांपर्यंत , भगतसिंगांपासून ते चापेकर बंधूंपर्यंत सगळ्यांना एकजात स्वातंत्र्यलढ्यातील भिकारी असे संबोधणाऱ्यांची गांजाची नशा बाळासाहेब ठाकरे यांनी एका दमात उतरवून त्यांना पाच फूट जमिनीत गाडले असते.