जगताप कुटुंबियांमध्ये उमेदवारीवरून कोणताही वाद नाही – चंद्रकांत पाटील

पुणे : विधानसभेच्या कसबा आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघांतील पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या पक्षनेतृत्वानं उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यानुसार श्री. हेमंत रासने कसबा आणि पिंपरी-चिंचवडमधील पोटनिवडणुकीसाठी श्रीमती अश्विनी लक्ष्मण जगताप यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपने टिळकांच्या कुटुंबाबाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्याने, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, शुक्रवारी रात्री मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी टिळकवाड्यात जाऊन शैलेंद्र टिळक आणि कुणाल टिळक यांची भेट घेतली. यावेळी दोघांशीही चर्चा करून भारतीय जनता पार्टी त्यांना सन्मानाचं स्थान देईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले. दोघांनीही आम्ही पक्षाबरोबर एकनिष्ठ राहणार आहोत असं सांगितले.
चंद्रकांत पाटील यांनी पुढे म्हटले कि, जगताप कुटुंबियांमध्ये उमेदवारीवरून कोणताही वाद नाही. लोकांनी याबाबत अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मण जगताप यांचा मुलगा वयाने लहान आहे, पण त्याने काल समजदारीची भूमिका घेतली आणि आमच्या कुटुंबात कोणताही वाद नसल्याचे म्हटलं. आमच्या कुटुंबात कोणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असे त्यांनी म्हटले. मी नेहमी सांगितलं आहे कि जर अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळाली तर शंकर जगताप हे निवडणुकीचे प्रमुख असतील. मी पुण्याचा पालकमंत्री म्हणून शंकर जगताप यांना निवडणुकीचे प्रमुख घोषित करतो, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
माझे सहकारी मुक्ताताई टिळक आणि लक्ष्मणभाऊ जगताप यांनी अकालीच आपला निरोप घेतला. त्यामुळे ही पोटनिवडणूक होते आहे. मला खात्री आहे की, त्यांची अपुरी राहिलेली कामं पूर्ण होण्यासाठी मतदारांकडून पुन्हा एकदा भाजपावरच विश्वास दाखवला जाईल आणि श्री. रासने आणि श्रीमती अश्विनी जगताप यांचाच पुन्हा विजय होईल. या दोन्ही उमेदवारांना पोटनिवडणुकीसाठी शुभेच्छा देतानाच या दोन्ही मतदारसंघांत मतदार नेहमीप्रमाणे भाजपाचीच साथ देतील आणि आमचाच विजय होईल, असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!