पुणे मनपाच्याहद्दीतील सर्व इमारतींच्या लिफ्टचे सेफ्टी ऑडिट करा, राष्ट्रवादी अर्बन सेलची मागणी
पुणे : पुण्याचा विस्तार चहूबाजूंनी होत आहे, देशातील विविध राज्यातील तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून लोक पुण्यात स्थायिक झाले आहेत. येणाऱ्या सर्व नागरिकांना सामावून घेतांना शहरात उंच उंच इमारती उभारल्या जात आहेत येणाऱ्या लिफ्ट मध्ये जाणे नक्की सुरक्षित आहे का? सहकारी संस्थांचे व्यवस्थापक नक्की त्याची वेळच्यावेळी देखभाल करून योग्यरीत्या या लिफ्ट कशा कार्यान्वित राहतील हे पाहतात का ? नाही तर काय परिणाम होऊ शकतो याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर अर्बन सेलने निवेदन देत महानगरपालिकेच्या आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.
निवेदनात म्हटल्या प्रमाणे गुरुवार, दि. २ फेब्रुवारी रोजी पुणे मनपाच्या घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतीची लिफ्ट अचानक बंद पडल्याने मनपाची अकार्यक्षमता दिसून आली. या लिफ्टमध्ये मनपाचेच चार अधिकारी म्हणजे मुख्य अभियंता श्री. अनिरुद्ध पावसकर, श्री. प्रसन्नराघव जोशी, श्री. नंदकिशोर जगताप, श्री. इंद्रभान रणदिवे तसेच एक दिव्यांग महिला भगिनी उपस्थित होत्या. यामध्ये सुदैवाने कोणतीही विपरीत घटना या ठिकाणी घडली नाही.
नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलच्या माध्यमातून पुणे मनपा आयुक्त यांना याबाबत निवेदन देण्यात आले, या भेटीदरम्यान त्यांना निवेदन देऊन भविष्यातील संभाव्य घटना टाळण्यासाठी मनपाच्या सर्व इमारतींचे सेफ्टी ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी यामध्ये करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी पुणे शहर अर्बन सेलचे समन्वयक स्वप्नील दुधाने तसेच उपसमन्वयक स्वप्नील खडके उपस्थित होते.