पुण्यातील आणि महाराष्ट्राचे मोठे ठेकेदार कोणाचे पार्टनर आहेत? हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे, खासदार मुरलीधर मोहोळ यांचे सुप्रिया सुळेंना चोख प्रत्युत्तर

98
पुणे : पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या मंत्रिपदाचा उपयोग कंत्राटदारांना न होता पुणेकरांना व्हावा असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. ठेकेदार कोणी पोसले? कोणी मोठे केले? पुण्यातील आणि महाराष्ट्राचे मोठे ठेकेदार कोणाचे पार्टनर आहेत? हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे, असे चोख प्रत्युत्तर मोहोळ यांनी दिले.
मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले कि, खरं तर जवळपास ४० वर्षांनंतर जनतेतून निवडून आलेल्या पुण्याच्या खासदाराला मंत्रीपदाची संधी मिळाली. ही बाब समस्त पुणेकरांना गौरवान्वित करणारी आहे आणि पुण्याची राजकीय संस्कृती पाहिली तर यांचं निखळ मनानेच स्वागत अपेक्षित होतं. असो, पण या निमित्ताने आपल्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शनही पुणेकरांना घडलं, असे मोहोळ म्हणाले. ताई, आपली ‘मळमळ’ आम्ही समजू शकतो. माझ्यासारख्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला थेट केंद्रीय मंत्रीपदावर संधी मिळणे, हे आपल्यासारख्या सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना लवकर पचणी पडणारे नाही. त्यामुळे आपली टिप्पणी स्वाभाविक मानतो, असा खोचक टोला मोहोळ यांनी लगावला.
मोहोळ पुढे म्हणाले , उरला प्रश्न ठेकदारांचा, तर ठेकेदार कोणी पोसले? कोणी मोठे केले? पुण्यातील आणि महाराष्ट्राचे मोठे ठेकेदार कोणाचे पार्टनर आहेत? हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे असल्या तकलादू टिपण्णी करुन स्वतःचं हसं सोडून दुसरं काही होणार नाही, असे चोख प्रत्युत्तर त्यांनी दिले.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ?
 
पुण्याला मंत्रिपद मिळाल्याचा आनंद. मंत्रिपदाचा उपयोग कंत्राटदारांना न होता पुणेकरांना व्हावा , असा टोला त्यांनी लगावला. जी काय सत्ता व्हावी ती मायबाप जनतेसाठी व्हावी एवढीच माफक अपेक्षा असल्याचे देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.