दोन दिवसांपूर्वी आमदार आदित्य ठाकरे त्यांच्यावर हल्ला झाला. त्यानंतर काल प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाला. या घटनांवरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. घटनांमागील मास्टरमाइंड शोधून काढला पाहिजे. त्याला कडक शासन झाले पाहिजे, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.
आमदार आदित्य ठाकरे व प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्यातील प्रत्येक व्यक्तीचे संरक्षण करणे ही राज्य सरकारची आणि पोलिस खात्याची जबाबदारी असते. लाखो लोकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या व्यक्तींवर हल्ले होणार असतील तर यामध्ये गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, अशी मागणी अजित पवारांनी केली. असे हल्ले कोणावरही होऊ नयेत. यामागचा मास्टरमाईंड शोधून त्यावर कडक शासन करावे. कायदा हातात घेण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असा समाजात संदेश द्यावा, असे मत अजित पवारांनी व्यक्त केले.
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या जाहीरातबाजीवर अजित पवारांनी निशाणा साधला. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे हे जाहीरातबाजी केल्याशिवाय सर्वसामान्यांना कसे कळणार? असा उपरोधिक टोला अजित पवारांनी लगावला. कुठे खर्च करावा, कशाला प्राधान्य द्यावे हे कळायला हवे. दुर्लक्षित-वंचित वर्गाचे राहणीमान उंचावण्यासाठी सरकारने लोकाभिमुख कारभार करायचा असतो, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.
Get real time updates directly on you device, subscribe now.