मंत्र्यांना विधिमंडळाच्या कामकाजात रसच नाही विधिमंडळाची गरीमा राखण्यात सत्ताधारी अपयशी – अजित पवार
सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदस्य विविध आयुधांचा वापर करुन सभागृहात आपले प्रश्न मांडत असतात. मात्र सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यामुळे आज पुन्हा आठ पैकी केवळ एका लक्षवेधीवर सभागृहात चर्चा झाली, इतर लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की आली. मंत्र्यांच्या अनुपस्थितीचे प्रकार वारंवार होत असल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा रुद्रावतार सभागृहाने अनुभवला.
मंत्री व्हायला पुढे-पुढे करता मग सभागृहात का उपस्थित राहात नाही? असा सवाल करुन मंत्र्यांना विधिमंडळाच्या कामकाजात कोणताच रस नाही, विधिमंडळाची गरीमा राखण्यात सत्ताधारी अपयशी ठरत असल्याचा घणाघात अजितदादांनी केला. तसेच संसदीय कार्यमंत्री सुद्धा सभागृहात कायमच अनुपस्थित असतात, त्यांना जमत नसेल तर त्यांनी पद सोडावे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेत्यांनी केला.
राज्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी विधिमंडळ सभागृह व्यवस्थित चालण्यासाठी विरोधी पक्ष सर्वतोपरी सहकार्य करत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सभागृहाची प्रथा, परंपरा मोडण्याचे काम सत्ताधाऱ्यांच्याकडून होत आहे. मंत्रिपद मिळविण्यासाठी अनेक जण पुढे-पुढे करतात, मग सभागृहात कामकाजाच्यावेळी हे मंत्री अनुपस्थित का राहतात? असा सवाल करत सभागृहात आश्वासित केलेल्या सर्व बैठका घेण्याची मागणी अजितदादांनी केली.