राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पहिला उमेदवार ठरला, दुसरा थोड्यावेळात होणार जाहीर, बारामतीच नाव गुलदस्त्यातच ?

46

पुणे : पुण्यामध्ये आज राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पुण्यात पार पडली. बैठकीत लोकसभेच्या ७ जागा लढविण्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असून यावेळी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर विविध लोकसभा मतदारसंघाची जवाबदारी यावेळी सोपविण्यात आली. यावेळी महायुती मधील लोकसभेच्या जागावाटपाचे काम ९९% पूर्ण झालं असून येत्या २८ तारखेला याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती देण्यात येईल अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

विशेष म्हणजे यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महायुतीचा लोकसभेचा पहिला उमेदवार म्हणून रायगड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे नाव जाहीर केले. रायगड शिवसेना आणि राष्ट्रवादीची ताकद असणारा जिल्हा आहे. पालकमंत्री पदावरून झालेला संघर्ष अजून देखील मिटला नसताना. तटकरेंच्या विरोधात वेळोवेळी भूमिका घेणाऱ्या शिवसेना प्रतोद महाडचे आमदार भरत गोगावले, खोपोली कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची प्रामाणिक साथ महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे यांना मिळणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सुनील तटकरे हे देखील शिवसेनेच्या नेत्यांशी जुळवून घेत लोकसभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या आव्हानाला कसे सामोरे जातात हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.

दुसरा उमेदवार थोड्याच वेळात होणार जाहीर

या पत्रकार परिषदेनंतर आंबेगाव येथे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पक्षप्रवेशासाठी जाणार असल्याचे सांगत दुसरा उमेदवार तेथे जाहीर करण्यात असल्याचे सूतोवाच अजित पवार यांनी यावेळी केले. गेले काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांमध्ये लोकसभेच्या अनेक मतदारसंघासाठी चर्चा सुरु होत्या त्यातील शिरूर लोकसभा मतदार संघ हा चर्चेचा विषय ठरला होता. राष्ट्रवादीने या मतदारसंघावर दावा केल्यानंतर उमेदवार कोण असणार यावर चर्चा सुरु होती. शिवाजीराव आढळराव पाटील सेनेतून राष्ट्रवादीत जाणार कि भाजपच्या प्रदीप कंद यांना संधी मिळणार याबाबत उलट सुलट चर्चा चालू असताना आज होणाऱ्या आढळराव पाटील यांच्या प्रवेशाने उमेदवार तेच असणार हे बऱ्यापैकी निश्चित झाले आहे.

यावेळी पवार यांच्यासोबत सुनील तटकरे, धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर तसेच राष्ट्रवादीचे मंत्री, विधानसभा सदस्य तसेच प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.