दादा भुसे यांनी दिलगिरी व्यक्त करावी, सभागृहात शरद पवारांच्या उल्लेखावरून अजित पवार संतप्त

पन्नास खोके माजलेत बोके… पन्नास खोके, एकदम ओके.. दादा भुसे मुर्दाबाद…दादा भुसे यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय… अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी वेलमध्ये उतरत जोरदार आंदोलन केले. आदरणीय शरद पवार साहेब यांच्याबद्दल मंत्री दादा भुसे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सभागृहात आक्रमक झाले आणि वेलमध्ये उतरत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दादा भुसे यांनी दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी केली.

खासदार संजय राऊत यांनी दादा भुसे यांच्यावर कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप केला. त्या आरोपावर प्रत्युत्तर देण्यासाठी आज विधानसभेत दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी असे विधान केले कि,आम्हाला वारंवार गद्दार म्हणणारे आणि आमच्याच मतांवर राज्यसभेवर निवडून गेलेल्या संजय राऊतांनी काल एक ट्विट केले. जगाच्या पाठीवर असलेल्या कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून या ट्विटची चौकशी करण्यात यावी, असे भुसे यांनी म्हटले. त्या चौकशीत मी दोषी आढळलॊ तर आमदारकी आणि मंत्रिपदाचा राजीनामा देत राजकारणातून निवृत्त होईल. जर खोटे आढळून आले तर या महागद्दारांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, असे आव्हान भुसे यांनी केले. दादा भुसे यांनी पुढे असे म्हटले कि, हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादी आणि शरद पवारांची करतात. संजय राऊतांनी मालेगावच्या नागरिकांची आणि महाराष्ट्राची माफी मागावी.

भुसे यांनी केलेल्या शरद पवार यांच्या उल्लेखावरून अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. पण दादा भुसे त्यांची भूमिका मांडत असताना आमचे राष्ट्रीय नेते शार पवारांचा उल्लेख करण्याचं काडीचंही कारण नव्हतं. शरद पवार ५५ वर्ष समाजकारण – राजकारण करतात. नरेंद्र मोदींनीही शरद पवारांविषयी काय म्हटलंय हे सगळ्यांना माहिती आहे.  भुसे तुमच्याकडून तर हि अपेक्षा अजिबात नव्हती. तुम्ही तुमचे शब्द मागे घ्या. दिलगिरी व्यक्त करा. आम्ही हा विषय संपवायला तयार आहोत. नाहीतर आम्हाला वॉल्कआऊट करावं लागेल असे अजित पवार यांनी म्हटले.