सदू आणि मधू भेटले…. मग मी काय बोलणार?, राज ठाकरे – एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. याभेटीवरून विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. खासदार संजय राऊत यांनी देखील राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे भेटीवर जोरदार टोलेबाजी केली आहे. सदू आणि मधू भेटले असतील, मालेगावातील उद्धव ठाकरेंची विराट सभा पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले असतील ते त्यांनी एकमेकांनी पुसले असतील. आम्ही त्या भेटीवर काय बोलणार ? असा प्रश्न उपस्थित करत राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे.
संजय राऊत म्हणले कि, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली तर मग मी काय बोलणार? सदू आणि मधू भेटले. बालभारतीत धडा होता आम्हाला सदू आणि मधू भेटल्याचा तसे भेटले असतील. ते जुने मित्र असतील किंवा नव्याने प्रेम उफाळून आलं असेल. मालेगावातील जी विराट सभा झाली त्यानंतर त्यांच्या भावना उचंबळून आल्या असतील, एकमेकांचे अश्रू पुसायला भेटले असतील, असा टोला राऊत यांनी लगावला.
राऊत यांनी सावरकरांच्या अपमानाबाबत देखील भाष्य केले. ते म्हणाले कि, महाराष्ट्रात वीर सावकारांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. त्यांना माफीवीर म्हणणं त्यांच्या इतर कुठल्याही प्रकारे अपमान करणं हे आम्ही अजिबात सहन करणार नाही. महाराष्ट्र सहन करणार नाही. मी या विषयावर दिल्लीत जाऊन राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार आहे असे राऊत यांनी म्हटले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काहीही काम उरलेलं नाही. आता उत्तर सभा घेतील, मग दक्षिण सभा घ्या. त्यानंतर नेऋत्य सभा घ्या. हा त्यांना छंद जडला आहे. महाराष्ट्रात त्यांना काही काम उरलेलं नाही. माझं त्यांना सांगणं आहे नीट राज्य कारभार करा. राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे, त्याला मदत करा असे राऊत म्हटले.