विनोद तावडे यांना मातृशोक… परमेश्वर मातोश्रींच्या आत्म्यास सद्गती देवो, चंद्रकांत पाटील यांनी केली श्रद्धांजली अर्पण

पुणे : भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्या आई विजया श्रीधर तावडे यांचे सोमवारी  निधन झाले. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ८५ वर्षांच्या होत्या. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात विनोद तावडे यांच्यासह उद्योजक पुत्र विलास, विवेक हि मुले, कन्या जयश्री कदम,सामाजिक कार्यकर्त्या स्नुषा वर्षा तावडे आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. याचे वृत्त कळताच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत म्हटले आहे कि, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री. विनोद तावडे यांच्या मातोश्री व माझ्या माई विजया श्रीधर तावडेजी यांच्या निधनाचे वृत्त कळलं. मातृत्वाचं नातं फारच घट्ट असतं. आपल्या जडणघडणीत आईचा मोलाचा वाटा असतो. ती एक अखंड ऊर्जास्त्रोत असते. या दुःखद प्रसंगी समस्त भाजपा परिवार विनोदजी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभा आहे. परमेश्वर मातोश्रींच्या आत्म्यास सद्गती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली , असे त्यांनी नमूद केले आहे.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव यात्रेचं भाजपकडून राज्यभर आयोजन केले आहे. सोमवारी विनोद तावडे हे सावरकर यात्रेत सहभागी होते. राष्ट्रीय महासचिव विनोदजी तावडे यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने माननीय विनोदजींनी सर्वांना मार्गदर्शन केले. योग्य नियोजन आणि बूथ सशक्तीकरणाद्वारे भारतीय जनता पक्षाला आगामी निवडणुकीत घवघवीत यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर आई विजय तावडे याच्या निधनाची बातमी आली. आईच्या निधनाची बातमी कळताच तावडे हे तातडीने मुंबईकडे रवाना झाले.