रावेत येथील होर्डिंग दुर्घटनेची राज्य सरकारने तातडीने दखल घेतल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मानले आभार

पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील रावेत भागामध्ये सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली. पावसाच्या आडोशाला थांबलेल्या प्रवाशांवर होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी ३ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेची राज्य सरकारने तातडीने दखल घेतल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी ट्विट करत म्हटले आहे कि, पुणे जिल्ह्यातील रावेत येथे पावसामुळे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. रावेत ओव्हरब्रीज सर्व्हिस रोडवर वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळल्याने या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे या घटनेतील जखमी रुग्णांच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येणार आहे. या घटनेची राज्य सरकारने तातडीने दखल घेतल्याबद्दल आभार, असे पाटील यांनी आपल्या ट्विट मध्ये नमूद केले आहे.

वादळी पावसाने रावेत किवळे येथील कात्रज बायपास जवळच्या सर्व्हिस रोडवर एका पंक्चरच्या दुकानाजवळ येणारे जाणारे प्रवासी थांबले होते. अचानक जाहिरातीचा फलक कोसळला यात आठ जण अडकले होते. स्थानिकांनी तातडीने जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला.