मानवनिर्मित आपत्तीपासून इमारतींसाठी संरक्षणात्मक उपाययोजना सुचविणारा अहवाल तज्ज्ञ समितीकडून मुख्यमंत्र्यांना सादर

मुंबई : राज्यातील अतिमहत्त्वाच्या इमारती, रुग्णालये, पंचतारांकित हॉटेल, शाळा, देवस्थान यांवर मानवनिर्मित आपत्ती, दहशतवादी हल्ल्यापासून इमारतींना संरक्षणात्मक उपाययोजना सुचविणारा अहवाल तज्ज्ञ समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला.

मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात तज्ज्ञ समितीने  मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, सदस्य अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महापालिकेचे मुख्य अभियंता सुनील राठोड, वास्तुविशारद संदीप ईश्वरे, एन. आर. शेंडे यावेळी उपस्थित होते.

दहशतवादी हल्ले, मानवनिर्मित आपत्तींमुळे जीवित आणि मालमत्तेची लक्षणीय हानी होऊ शकते आणि आर्थिक विकासाला त्याचा फटका बसतो. ही जोखीम कमी करण्याच्या उपायांद्वारे आपत्ती टाळता येऊ शकते. मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात विकास नियंत्रण नियमावलीमध्ये योग्य त्या तरतुदी करण्याचे आदेश दिले होते.

या अहवालात महत्त्वाच्या मोठ्या सार्वजनिक आणि अतिउंच इमारतींच्या सुरक्षिततेचे विश्लेषण करण्यात आले आहे. दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.