मुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी), आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), या संस्थांकडून देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सवलती, नियमावली यात एक सूत्रता राहावी यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली. या संस्थाच्या माध्यमातून शैक्षणिक योजनांमध्ये वसतिगृह योजना, परदेशी शिक्षणासाठी राबविण्यात येणारी शिष्यवृत्ती योजना आणि पीएचडीसाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समान लाभ कसा देता येईल, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

अनुसूचित जाती, जमाती,ओबीसी आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन खूप सकारात्मक आहे. बार्टी, टीआरटीआय, सारथी आणि महाज्योती या चारही संस्थांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या शैक्षणिक योजनांमध्ये एकसूत्रता असावी आणि विद्यार्थ्यांना समान लाभ देण्यासाठी या चारही संस्थांनी समन्वय ठेवणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी सांगितले, तसेच सारथी, बार्टी, महाज्योती आणि टीआरटीआय या चारही संस्थांनी शैक्षणिक योजनांचा समान लाभ विद्यार्थ्यांना देण्यासाठी निकष, शैक्षणिक अर्हता, देण्यात येणाऱ्या लाभाची मर्यादा इत्यादीबाबींचा समावेश असणारा सर्वकष असा प्रस्ताव तयार करून विभागास सादर करावा,अशा सुचना देखील अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी अपर मुख्यसचिव वित्त विभाग डॉ. नितिन करीर, अपर मुख्यसचिव नियोजन राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव व्यय ओ.पी.गुप्ता, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, बार्टीचे महासंचलक सुनिल वारे, सारथीचे चेअरमन अजित निबांळकर, टीआरटीआयचे आयुक्त राजेंद्र भारुड, सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे ,महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.