राज्यात 1 हजार 500 महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार – चंद्रकांत पाटील

पुणे : पुणे येथील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर सभागृहाचा उदघाटन सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि पुण्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उन्नत ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
“राज्यात 1 हजार 500 महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. तसेच खाजगी विद्यापीठ आणि महाविद्यालयांना नवे अभ्यासक्रम सुरू करण्यातील अडथळे येत आहेत ते लवकरच दूर करण्यात येतील आणि खासगी विद्यापीठात 10 टक्के गरीब विद्यार्थ्यांचे शुल्कही माफ केले जाईल, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थितांना आश्वस्त केले.
यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, माधुरी मिसाळ, माजी खासदार अमर साबळे, अपर पोलीस महासंचालक व राज्याचे कारागृह व सुधार सेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सचिव शामकांत देशमुख, सहकार्यवाह सुरेश तोडकर, जोत्स्ना एकबोटे आदी उपस्थित होते.