उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकाऱ्यांचे अभिनंदन
मुंबई : काल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली. अनेक दिवसापासून सुरु असलेलया या नाट्याचा असा शेवट होईल हे अनेकांना अपेक्षित नव्हते. अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते या सरकारमध्ये सामील झाल्याने आता हे ट्रिपल इंजिनचे सरकार झाले असून अजून वेगवान कारभार करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
भाजपचे नेते तसेच महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या विकासाच्या अजेंड्यावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याबद्दल अजितदादांचे व त्यांच्यासोबत शपथ घेतलेल्या सर्व मंत्र्यांचे हार्दिक अभिनंदन! असे चंद्रकांत पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हंटले आहे.
विकासाच्या मुद्यांवर एकत्र आलेले हे पक्ष निश्चितच पुढील काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची विकासात्मक गतिमान प्रगती होईल असा विश्वास सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.