श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा अश्वारुढ पुतळा पर्वती येथे उभारण्यात येणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार लोकार्पण होणार असल्याची चंद्रकांत पाटील यांची माहिती
पुणे : पुण्यातील महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांपैकी एक स्थळ म्हणजे पर्वती टेकडी ! पर्वताई देवीच्या नावावरून या टेकडीला पर्वती हे नाव पडले. पर्वतीवरील निसर्गरम्य सौंदर्यामुळे इ.स.१७४९ मध्ये श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी येथे मंदिरे बांधली. त्यातील मुख्य मंदिर म्हणजे देवदेवेश्वराचे पंचायतन! इथल्या पुरातन पर्वताई देवीचा उल्लेख शिवकाळातही सापडतो. अशा या ऐतिहासिक ठिकाणी महापराक्रमी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या स्मृतिची जपणूक व्हावी यासाठी श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात येत असून याचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
आज पाटील यांनी या परिसराची आणि पुतळ्याच्या कामाची पाहणी केली. तसेच पेशवेकालीन देवदेवेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, गिरीश खत्री तसेच भाजपचे काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.