राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल रमेश बैस, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १११ वा दीक्षान्त समारंभ संपन्न

25

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १११ वा दीक्षांत समारंभ राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाला. या दीक्षांत समारंभास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील नागपूर येथे उपस्थित राहिले. नव्या पिढीने जाय सारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी केला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रपती मुर्मूजी यांनी सर्व विद्यार्थ्यांना केले.

याप्रसंगी राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी उपस्थित होते.
भारतीय मूल्यांना अनुसरून सर्वांना उच्च व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मूळ उद्देश आहे. यामुळे देश एक वैश्विक ज्ञानशक्ती (ग्लोबल नॉलेज पॉवर) म्हणून स्थापित होईल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला. औपचारिक पदवी हे शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट नसून वेगाने बदल घडणाऱ्या जगात निरंतर शिक्षण हेच प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय असावे, असे राष्ट्रपतींनी म्हटले.  ]
विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावरील विकसित कौशल्य आत्मसात करावे तसेच योग शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यातील जागतिक संधींचा लाभ घेण्याचे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
विदर्भाच्या विकासात विद्यापीठाचे मोलाचे योगदान आहे. विदर्भ हा महाराष्ट्राचा विकसनशील भाग असून विद्यापीठाच्या माध्यमातून स्थानिक गरजांनुसार संशोधनाची गरज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
गुणात्मक मनुष्यबळ तयार करणे ही काळाची गरज आहे. जागतिक स्तरावर बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करू शकेल, अशी युवापिढी घडविण्याचे आव्हान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने स्वीकारावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले

Get real time updates directly on you device, subscribe now.