कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत सामंजस्य करार

मुंबई : युरोपियन देशांची कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्याच्या उपक्रमाच्या पूर्ततेच्या अनुषंगाने पहिले पाऊल म्हणून शासन स्तरावर शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, कृषी, वैद्यकीय शिक्षण, उद्योग व कामगार, कौशल्य विकास आणि उद्योजकता या विभागाचे मंत्री आणि सचिव यांचा कृती गट स्थापन करण्यात आला आहे. या कृती गटाच्या निर्णयानुसार जर्मनीतील बाडेन गुटेनबर्ग या औद्योगिकदृष्ट्या अतिप्रगत राज्यासमवेत आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
युरोपियन देशाच्या मागणीप्रमाणे त्यांना कुशल मनुष्यबळ पुरविण्याचा महत्वपूर्ण उपक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासन आणि जर्मनीच्या बाडेन गुटेनबर्ग राज्यादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला असून या करारामुळे दोन्ही राज्यांमधील परस्पर संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान, जगातील उद्योग व्यवसायांना कुशल मनुष्यबळ पुरवण्याची मोठी क्षमता भारतात आहे. ही संधी साधण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना परदेशात सुद्धा अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रातील मनुष्यबळाचा लौकिक आणि बौद्धिक क्षमतेची ओळख जागतिक पातळीवर गणली जाणार असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी अधोरेखित केले.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कामगार मंत्री सुरेश खाडे, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच जर्मनीचे मिनिस्टर ऑफ स्टेट डॉ. फ्लोरियन स्टेगमन, शालेय शिक्षण, युवक आणि क्रीडा मंत्री थेरेसा स्कॉपर यांच्यासह जर्मनीचे शिष्टमंडळ उपस्थित होते

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!